Ahmednagar News : राज्यात मान्सूनची प्रगती; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

Published on -

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. राज्यात मान्सूनची प्रगती सुरू असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच महाराष्ट्राची किनारपट्टी व्यापली आहे. डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. पुढील काही दिवस यलो, ऑरेंज अलर्ट असून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनने सोमवारी काही भाग वगळता संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्हा व्यापला. तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यात पोहोचला. तर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांच्या आणखी काही भागात पोहोचला आहे. मान्सूनची दिशा डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, निजामाबाद, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम भागात होती. अनुकूल वातावरणामुळे मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे.

तसेच गुजरातच्या काही भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. ११ व १२ जून रोजी कोकणातील भागात जोरदार पावसाबरोबर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार तसेच विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पुणे, महाबळेश्वर, सांगली, रत्नागिरी, धाराशिव, परभणी, बीड, अमरावती आदी भागात पाऊस पडला. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News