Ahmednagar News : ‘मुळा’चे पाणी तळाला, सुपा एमआयडीसीवर संकटाची चाहूल, सूक्ष्मनियोजनाची गरज

Ajay Patil
Published:
supe

Ahmednagar News : मुळा जलाशयातील पाणी पातळी तळाला गेली आहे. पावसाचे झालेले अत्यल्प प्रमाण व जायकवाडीला सोडलेले पाणी यामुळे मुळाची पाणीपातळी खालावली आहे. मुळावर अवलंबून असणाऱ्या पाणीयोजना देखील सध्या पाणीकपातीच्या संकटावर आहेत.

परंतु आता यावर अवलंबून असणाऱ्या पारनेर तालुक्यातील सुपा उद्योगनगरीवर देखील आता पाणीटंचाईचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे उद्योगांची धडधड वाढली आहे. उद्योजकांना आतापासून नियोजनपूर्वक काटकसरीने पाणी वापराबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

खंडीत विद्युत पुरवठा, जलवाहिनीमधील बिघाड यामुळे सुपा उद्योगनगरीतील पाणीपुरवठा कधी कधी विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र थोटे यांनी सांगितले. एमआयडीसीसाठी नऊ ते साडेनऊ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचे आरक्षण आहे.

त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे त्यांनी नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगून अॅग्रिमेंटप्रमाणे पाणी राखीव ठेवावे लागते. असे असले तरी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते. हा मुद्दाही दुर्लक्षून चालणार नाही. मध्यंतरी एक दिवस पाणी बंद होते तर काही दिवस मागणीप्रमाणे पाणी न मिळाल्याने विकत टँकरने पाणी घ्यावे लागल्याचे सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.

आतापासूनच नियोजनाची गरज
कारखान्यासाठी पाणी मूलभूत गरजेची गोष्ट आहे. या उद्योगनगरीमधील काही उत्पादने पाण्याशी निगडित आहेत. भविष्यात सुपा उद्योग नगरीला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे.

ही एमआयडीसी झपाट्याने वाढत असल्याने मुळा जलाशयातील पाण्याबरोबरच अन्य स्रोत जसे विसापूर जलाशयातील पाण्यातून काही पाणी आरक्षित ठेवण्याची गरज असल्याची काही उद्योजकांची मागणी आहे. याबाबत एमआयडीसीने नियोजन, सर्व्हे, मागणी, पाठपुरावा याबाबत कार्यवाही करण्याबाबत सुपा कारखानदार संघटना आग्रही असल्याचा मुद्दा संघटनेच्या बैठकीत उचलून धरण्यात आला होता.

सुपा एमआयडीसीमध्ये विस्तारित उद्योगनगरीत अनेक मोठ-मोठे उद्योग येत असल्याने भविष्यात पाण्याची मागणी मोठी राहणार आहे. त्यासाठी आतापासूनच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने प्लॅन तयार करावा अशी मागणी होत आहे.

एमआयडीसी कडून बारा रुपये प्रति हजार लिटरने पुरवठा
कारखान्यांना एमआयडीसीकडून बारा रुपये प्रति हजार लिटर दराने पाणी दिले जाते. शिवाय हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून फिल्टर होऊन येते. त्यामुळे त्याची उपयोगिता अधिक असते. उलट टँकरचे पाणी घ्यावे लागले, तर त्यासाठी हजार लिटरला शंभर रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.

शिवाय ते फिल्टर नसते. त्यामुळे त्यातील उपयोगात येणारे पाणी कमी असते. कारखान्यांना एमआयडीसीचेच पाणी उद्योगासाठी परवडते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe