Ahmednagar News : आता पारनेर नगरपंचायतची विजय औटी विरोधात पोलिसात तक्रार, नगरपंचायतमध्ये केलेत ‘हे’ धक्कादायक प्रकार..

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : खा. निलेश लंके यांचे निकटवर्तीय राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आले आहे. दरम्यान आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता थेट पारनेर नगरपंचायतने विजय औटी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व अन्य तिघांनी पारनेर नगरपंचायतच्या रजिस्टरला ३५ दुकाने व २५ फ्लॅटची खोटी नोंद लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे या तक्रारीमुळे समोर आले आहे. या संदर्भात नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले असल्याची माहिती समजली आहे.

विजय औटी, संभाजी बबनराव मगर, विजया भागाची नवले यांनी या नोंदी लावून बनावट दस्त तयार केले आहेत. याबाबत मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी पत्रात म्हटले आहे, पारनेर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ३९०३, ३५५४/१। ३५४०/१ व ३५४४/२ मिळकत नं. २५९४/२५९५/२५९६ या मिळकतींची स्थळ पाहणी केली असता त्या मिळकतीवर भैरवी अपार्टमेंट नावाची इमारत अस्तित्वात नाही.

मात्र नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नं. ८ वर भैरवी अपार्टमेंट असा उल्लेख करून त्यावर एकूण ३५ शॉप व केली २५ फ्लॅटची बेकायदेशीर नोंद आढळली. सदर नोंद दुय्यम निबंधक यांच्याकडील दस्त ५७१७/२०१५ सुची क्रमांक २ व अर्जावरून नगरपंचायत दप्तरी घेतल्याचे सिद्ध होत आहे. शॉप व फ्लॅट नसतानाही नगरपंचायत प्रशासनाकडे खोटा अर्ज करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या नोंदी लावून काहीतरी हेतू साध्य करण्याचा संबंधिताचा प्रयत्न दिसतो.

जमीनमालक विजय औटी, मगर, नवले यांनी खोट्या नोंदी लावून बनावट दस्त तयार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्याकामी अधिकारीही प्राधिकृत करण्यात आले आहेत.

अमानुष मारहाणीचा व्हिडीओ
विजय औटी व त्याच्या साथीदारांनी अॅड. राहुल झावरे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत झावरे यांना अत्यंत अमानुष व जीवघेण्या पद्धतीने मारहाण केली जात असल्याचा पुरावाच समोर आला आहे. पोलिसांसाठीही हा सबळ पुरावा आहे. या व्हिडीओत झावरे यांना दांडके, विटा अशा साधनांनी भररस्त्यावर जीवघेणी मारहाण झाल्याचे दिसत आहे. विधानसभा अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe