विधानसभेआधी पवार-फडणवीसांची साखरपेरणी ! अहमदनगरमधील ‘या’ खास माणसांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना १५९० कोटी रुपयांचे 'मार्जिन मनी लोन' राष्ट्रीय सहकार विकास निगमने उपलब्ध करून दिले आहे. या निधीचा कारखान्यांना खेळते भागभांडवल म्हणून उपयोग करता येणार आहे.

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना १५९० कोटी रुपयांचे ‘मार्जिन मनी लोन’ राष्ट्रीय सहकार विकास निगमने उपलब्ध करून दिले आहे. या निधीचा कारखान्यांना खेळते भागभांडवल म्हणून उपयोग करता येणार आहे.

विधानसभा निवडणुकीआधी ११ सहकारी साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देऊन सत्ताधाऱ्यांनी साखरपेरणी केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्य शासनामार्फत ‘मार्जिन मनी लोन’ उपल्बध करून दिले जाते.

ते मंजूर करण्यापूर्वी साखर आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि तांत्रिक छाननी करण्यासाठी समिती नेमली जाते. यावेळी या समितीने अभ्यास करून पात्र प्रस्ताव मंत्रालयात पाठवले होते. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील अध्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रस्तावांनुसार ११ कारखान्यांना निधी देण्यासंदर्भात मान्यता दर्शवली.

त्यानुसार ११ सहकारी साखर कारखान्यांना १५९० कोटी १६ लाख रुपये इतका निधी मंजूर केल असून हे कारखाने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. राज्यात तीन पक्षांचे महायुतीचे सरकार आहे.

यामध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतात. सहकार हा विषय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिव्हाळ्याचा आहे. केंद्रात गृहमंत्री अमित शाह यांनी सहकार हे खाते आपल्याकडे ठेवले आहे,

तर राज्यात अजित पवार गटाने सहकार खाते आपल्याकडे राखले आहे. राज्यात भाजप नेत्यांच्या कारखान्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, तर उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्यांसाठी अंतिम निर्णय घेऊन यादी पात्र केली आहे. त्यामुळे या दोघा नेत्यांचे निष्ठावान आमदार, नेते यांच्या ताब्यातील कारखान्यांना हा निधी उपलब्ध झाला आहे.

फडणवीस यांनी शिफारस केलेले कारखाने
■ संत दामाजी सहकारी साखर कारखाना, सोलापूर (९४ कोटी)-शिवानंद पाटील, आमदार प्रशांत परिचारक गट
■ वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, अहमदनगर (९३ कोटी) – आमदार मोनिका राजळे
■ अगस्ती सहकार साखर कारखाना, अहमदनगर ( ९४ कोटी) – वैभव मधुकर पिचड

■ विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, धाराशिव (९४ कोटी) – माजी आमदार बसवराज पाटील
■ तात्यासाहेब कोरे सहकारी कारखाना, कोल्हापूर (३२७ कोटी) – आमदार विनय कोरे, जनसुराज्य पार्टी

अजित पवार यांनी शिफारस केलेले कारखाने
■ लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, बीड (९८ कोटी) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके
■ मारुतीराव घुले-पाटील सहकारी साखर कारखाना, अहमदनगर (१४० कोटी) – माजी आमदार चंद्रशेखर घुले

■ किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, भुईज, सातारा (३२७ कोटी) – आ. मकरंद पाटील
■ किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखाना, सातारा (१४० कोटी) – आमदार मकरंद पाटील

■ अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, बीड (८० कोटी) – मंत्री धनंजय मुंडे
■ शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, अहमदनगर (१०३ कोटी ४० लाख) – राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe