Ahmednagar News : समोर अनेक आव्हाने.. वडिलांनी भरपूर कष्ट सोसलेले.. आता परिस्थिती बदलायची व वेगळं काहीतरी करून दाखवायचे अशी मनाशी खूणगाठ.. त्यातून सुरु झाली प्रयत्नांची पराकाष्ठा.. अन थेट पोलिस उपनिरीक्षकपदी निवड..
ही यशोगाथा आहे अहमदनगर जिल्ह्यातील दत्तात्रय पोपट धायगुडे यांची. ते श्रीगोंदे तालुक्यातील हंगेवाडी येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय धायगुडे यांची घरची परिस्थिती बेताची. चार एकर शेती त्यावर कुटुंबाची गुजराण. कुटुंबाला हातभार लागावा, म्हणून पारंपरिक मेंढीपालनाचा वडील व्यवसाय करतात.

दत्तात्रय धायगुडे यांनी काष्टी येथील खासगी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षित नोकरी मिळत नव्हती. मित्रांच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
या परीक्षेविषयी काहीही माहिती नसताना केवळ धाडस दाखवत आपण स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्याचे धायगुडे सांगतात. दोन वर्षे अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत २०२१ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. त्याचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये धायगुडे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
घरात कुठलाही शिक्षणाचा वारसा नसताना केवळ जिद्द अन आत्मविश्वासाच्या जोरावर धायगुडे यांनी हे यश मिळविले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाबद्दल धायगुडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षेत मोठी संधी आहे. प्रयत्नांत सातत्य ठेवल्याने मला यशपर्यत पोहोचता आले. आई- वडील, कुटुंबातील सदस्य माझ्या पाठीशी ठाम उभे राहिल्यानेच मला यश मिळवता आले असे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय धायगुडे सांगतात.
नवा आदर्श
आजच्या तरुण पिढीपुढे हा नवा आदर्श निर्माण केला आहे. तरुणांसाठी ही एक प्रेरणा ठरू शकते. प्रयत्न, जिद्दीने यश मिळू शकते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.