Ahmednagar News : मदतीच्या आश्वासनानंतर शिवराम यांचा ‘यु टर्न’; मुस्लिम धर्मात परत जाण्याचा निर्णय घेतला मागे

Pragati
Published:

Ahmednagar News : आजारी मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने हिंदू धर्म स्वीकारणारे शिवराम आर्य यांनी मुलीच्या उपचारासाठी परत मुस्लिम धर्मात घरवापसी करण्याबाबत परत यु टर्न घेतला असून, आता आपण हा निर्णय रद्द करत असल्याचे सांगितले आहे.

मागील वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला. धर्मांतरानंतर जमीर शेख यांचे नाव बदलून शिवराम आर्य असे नामकरण करण्यात आले.

तर पत्नी अंजुम शेख हिने देखील सीता आर्य असे नाव धारण केले. तसेच दोन मुलांना बलराम आणि कृष्णा अशी नावे देण्यात आली. परंतु हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे काम धंदे बंद झाले. तसेच त्यांच्या मुलीच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली.

तिच्या उपचारामध्ये बरेच पैसे गेले. त्यामुळे पुढील मदतीसाठी सगळ्यांना फोन केले, कोणी मदतीला आले नाहीत. त्यामुळे आजारी मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने आपण परत मुस्लिम धर्म स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते.

नगर शहरातील मंगल गेट परिसरात त्यांचा हा कार्यक्रम देखील होणार होता. परंतु त्यांच्या परत मुस्लिम धर्म स्वीकारण्याच्या निर्णयानंतर अवघ्या एकाच दिवसात शिवराम यांच्या मुलीच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.

त्यामुळे आता आपल्या आजारी मुलीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत तसेच विविध माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असल्याने आपण आता परत मुस्लिम धर्मात घरवापसी करण्याचा निर्णय मागे घेत असल्याची माहिती शिवराम यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे ८ नोव्हेंबरला शिवराम आर्य यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. मात्र या दरम्यान त्यांचे स्वकीयही दुरावले, तसेच काम देखील बंद झाले. तसेच मुलीच्या उपचाराचा खर्च या सर्व कारणांमुळे अवघ्या २१५ दिवसांनंतरच त्यांनी पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आपण हिंदू धर्मात राहणार असल्याचे ते म्हणाले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe