Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत होते. काळ दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता.
सकाळपासून सगळीकडे मतमोजणीची धामधूम सुरू असताना दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने संगमनेर तालुक्यातील उंबरी तालुक्याताल बाळापूर, शेडगाव, माळेवाडी, पानोडी आणि परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत.

तर उंबरी बाळापूर आणि शेडगाव परिसरात विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असून सुरळीत होण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मंगळवारी लोकसभेचा निकाल असल्याने सर्वजण सकाळपासूनच टीव्ही अथवा मोबाईलवर निकाल पाहण्यात व्यस्त होते. या दरम्यान आश्वीसह परिसरात वातावरण दमट झाले होते. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती.
दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने काही वेळाने रौद्ररुप धारण केल्याने उंबरी बाळापूर, शेडगाव, माळेवाडी, पानोडी परिसरात असलेले वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली.
तर उंबरी बाळापूर येथील एका घराचे पत्रे उडून गेले. दरम्यान, या वादळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे देखील नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर उंबरी बाळापूर येथील गावठाण परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.