Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर आणि परिसरातील गावांमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. राजापूर येथे आढळा वस्तीवर संपत हासे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाखाली बांधलेल्या गीर गायीचा मृत्यू झाला.
गुंजाळवाडी परिसरात शेतांमध्ये जोरदार पाणी वाहिले, गोठा खाली दबला गेल्याने बांधकाम आणि शेड पडून त्याखाली दहा गायी दबल्या गेल्या. गुंजाळवाडी येथील शेतांमध्ये पाणी वाहिले. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बाळासाहेब चंद्रभान गुंजाळ यांच्या मालकीचा गोठा खाली दबला गेल्याने बांधकाम आणि शेड खाली पडले.
जेसीबीच्या साह्याने आणि ग्रामस्थांनी बचाव कार्य हाती घेत गायींचा जीव वाचविला. अनेक गायी जखमी झाल्या. राजापूर गावांतर्गत असलेल्या आढळामळा येथे संपत हासे राहात आहे. त्यांच्याकडे पाच ते सहा गाया आहेत. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी त्यांनी घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडाला गाय बांधली होती.
मात्र, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. याच दरम्यान वीज पडून गायीचा मृत्यू झाला, तर नारळाच्या झाडानेही पेट घेतला होता. घटनेची माहिती समजताच महसूल विभागासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत गायीचा पंचनामा केला. दरम्यान आता पाऊस पडता झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असताना प्रचंड उकाड्यानंतर आकाशात ढगांची गर्दी होत पावसाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सोसाट्याचा वारा आणि वादळाने कहर केला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी वाहिले. अचानक आलेल्या पावसान शेतकऱ्यांची धांदल उडाली. वादळाने काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले.