Ahmednagar News :खते,बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास होणार कठोर कारवाईचे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; यंदा मूग व सोयाबीनचा पेरा वाढणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News : जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशक यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावर तसेच नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करून तातडीने तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, निविष्ठाची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कृषी सेवा केंद्र यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असुन या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या नियम व अटीचे पालन करावे.
शेतकऱ्यांना  गुणवत्तापूर्ण  कृषी निविष्ठा पुरवठा वेळेत आणि रास्त भावात करून द्यावा. सर्व निविष्ठाचा साठा व भावफलक दैनंदिन दुकानाबाहेर शेतकऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे आणि खते भावफलक व साठाफलक लावलेला नसेल अशा सर्व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.
यावर्षी नगर तालुक्यात सुमारे ६४ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप लागवड होईल. त्यामध्ये १६ हजार हेक्टर सोयाबीन व १४ हजार हेक्टरवर मुगाच्या पेरणीचे नियोजन आहे. असे असले तरी, मूग व सोयाबीनच्या पेऱ्यात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात यंदा मृग नक्षत्रात सुरूवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील ११ महसुली मंडलापैकी दोन महसील मंडले सोडली, तर सर्वत्र १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता वाफसा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कृषी विभागाने तालुक्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वेळी पावसाने दगा दिल्याने मुगाच्या पेरण्या झाल्या नाहीत. यंदा मात्र सोयाबीन आणि मुगाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe