विद्यार्थ्यांनो पुन्हा जाणार इस्त्रो सहल ! ‘अशी’ होईल तुमची निवड

गेले काही वर्षे बंद असलेली जिल्हा परिषदेची इस्त्रो सहल आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रथम तालुका व नंतर जिल्हास्तरावर परीक्षा होऊन या सहलीसाठी एकूण ४२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

Published on -

Ahmednagar News : गेले काही वर्षे बंद असलेली जिल्हा परिषदेची इस्त्रो सहल आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रथम तालुका व नंतर जिल्हास्तरावर परीक्षा होऊन या सहलीसाठी एकूण ४२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन व्यापक व्हावा, त्यांच्यामध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही वर्षे खंड पडला होता.

आता या वर्षीपासून पुन्हा ही सहल सुरू होत आहे. डॉ. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (भुंबा, केरळ) येथे ही सहल जाणार असून हे भारताच्या इस्त्रो संस्थेचे मोठे संशोधन केंद्र आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाणार आहे.

यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनीशिक्षकांना सूचना दिल्या आहेत. या सहलीसाठी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ५ वी, ६ वी, ७, ८ वी मधील विद्यार्थ्यांची तालुका व जिल्हा या दोन स्तरावर परीक्षा घेण्यात येईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम पाचवी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकातील असेल. प्रत्येक तालुकास्तरावरील परीक्षेतून इयत्तानिहाय गुणानुक्रमे प्रथम ५ विद्यार्थी जिल्हास्तरासाठी पात्र ठरतील. त्यानंतर तोंडी परिक्षेतून ४२ विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

तालुकास्तरावरील परीक्षा २५ ऑगस्ट, तर जिल्हास्तरावरील परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!