राहुरी तालुक्यातील गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद सुरू असताना आज पहाटे गावक-यांसह कानिफनाथ भक्तांनी वेद मंत्राचा गजर व भजन करत कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवत प्राणप्रतिष्ठा केली आहे. अचानकपणे मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्याने पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असुन गावामधे मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता.
आज गुरूवार दि. 28 रोजी माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी कानिफनाथ मंदिरात भक्तजनांसह आरती केली. गुहा येथे अनेक वर्षांपासून कानिफनाथ आरती सुरू होती. मध्यंतरी काही लोकांनी अनाधिकृतपणे येथे कबरस्थान आहे. असे भासविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आज मंदिरात कानिफनाथ मूर्ती अवतरली असे समजले म्हणून मी पाहण्यासाठी आलो असल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
गुहा येथे गेल्या अनेक दिवसांपासून कानिफनाथ मंदिर की दर्गा असा दोन समाजात वाद सुरू आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी भजन सुरू असताना कानिफनाथ भक्तांवर एका समाजाच्या गटाने हल्ला चढविला होता. धार्मिक कार्यक्रमाला विरोध झाल्याने राहुरी तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला होता. घटनेबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल असून हा वाद देखील न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान आज पहाटे या ठिकाणी हिंदू बांधवांनी कानिफनाथ महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. वेदमंत्राच्या गजरात भजन करून सकाळच्या वेळी कानिफनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, प्रांताधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा गुहात दाखल झाला आहे.
त्यानंतर अहमदनगर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी या ठिकाणी भेट देऊन कानिफनाथ भक्त व गावकर्यांशी चर्चा केली. दरम्यान माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी कानिफनाथ मुर्तीचे दर्शन घेतले असून त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. त्यांच्यासमवेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, भैय्यासाहेब शेळके, के.मा.कोळसे,उमेश शेळके, सचिन मेहत्रे, सुजय काळे, विकास कोबरणे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही कायम गावकऱ्यांच्या पाठीशी : माजी आ. शिवाजी कर्डीले :- पुरातन काळापासून या ठिकाणी कानिफनाथ मंदिरात कानिफनाथ महाराजांची पूजा-अर्चा करण्यात येत होती.परंतु काही दिवसापूर्वी या ठिकाणी दोन समाजात वाद सुरू झाला.
एका समाजाने या ठिकाणी अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु नाथ महाराजांना हे मान्य झालं नाही, म्हणून अचानकपणे या ठिकाणी कानिफनाथ महाराज अवतरले अशी तालुक्यासह महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर मला देखील समजले.
मी तात्काळ या ठिकाणी येऊन भाविकांशी संवाद साधला आणि कानिफनाथ महाराजांची आरती करून आशीर्वाद घेतला. याबाबत गावकऱ्यांनी शांत राहावे आम्ही कायम गावकऱ्यांच्या पाठीशी आहोत. असे माजी आ. शिवाजी कर्डीले म्हणाले आहेत.