येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत भव्य सोहळा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत असला तरी देशभर त्याची तयारी सुरु आहे. प्रभू श्रीरामांचे भक्त संपूर्ण जगभर आहेत. २२ जानेवारीला सर्व मंदिरांमध्ये, घरांमध्ये दिवे पणत्या लावून दिवाळी साजरी होईल.
अयोध्येतील मंदिरासाठी काही ना काही योगदान देण्याची सर्वांचीच इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील कलावंत हेमंत दंडवते यांनी आरशांचे एकूण ४८४ तुकड्यांमध्ये विशिष्ट रचना करून, जुळणी करून ग्लूने व अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या माध्यमातून चिकटवून असामान्य कला दाखवली आहे.

यातून त्यांनी प्रभू श्रीराम यांचे भव्य काच म्यूरल प्रतिमा साकारली आहे. त्याची उंची ९ फूट व रूंदी ५ फूट असून ते फॅब्रिकेटेड फ्रेम मध्ये जोडले आहे. या काच कलाकृतीत प्रतिमा साकारताना अनेक मर्यादा असतात. असे असतानाही त्यांनी चांगली कलाकुसर साधली आहे.
श्रीरामांच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न, विलोभनीय आहेत. तसेच महिरप, दोन्ही बाजूंना स्तंभ व त्यावर प्रकाश प्रभाव सजावटीने म्यूरल अजून सुंदर दिसते. लवकरच संस्थेकडून तारिख निश्चित केल्यावर हे म्यूरल अयोध्येत सुचविलेल्या जागेवर अंतर्गत सजावटीसाठी भिंतीवर लावण्यात येईल.
ते निश्चितच अयोध्या नगरीचे शोभा वाढवेल व कला जगात नगरचे नाव मोठे होईल अशी अशा दंडवते यांनी व्यक्त केली. दिलीप गंधारे, सुनिल बोरा, राजाराम राय, अतुल राणा, सचिन पारखी, अब्बास कय्युमी, फखरुद्दीन टिनवाले आदींचे सहकार्य लाभले.