Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोटक्षेत्रात धुवांधार पाऊस झाला. मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली. प्रवरा, मुळा, गोदावरीला पूर आला होता. परंतु आता पाणलोटात पाऊस कमी झाला असून नद्यांच्या पुरात देखील कमी झाली आहे.
या पावसाने, पुराने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनींचे बांध फ़ुटले आहेत तर कोठे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सोमवारी पावसाचे प्रमाण कमी होताच महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. शुक्रवारपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत गेला होता. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही क्षेत्रांस अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला.
ओढ्या-नाल्यांना पूर आला. धरणांच्या पाणलोट क्षेत्राबाहेरही मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे दोन तीन दिवस भात खाचरांमधील भात पिके पाण्याखाली गेले आहेत. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे बांध फुटले,काही ठिकाणी घरांची पडझड झाली.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांमधून होत आहे. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार संयुक्तिक पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी होत गेला
आणि भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला. आज सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून ५ हजार १७६, तर निळवंडे धरणातून ८ हजार १२२ क्युसेकने विसर्ग सुरू होता. यामुळे प्रवरेची पाणी पातळी कमी झाली आहे.
मुळा खोऱ्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुळा नदीचा विसर्ग मंदावला. सायंकाळी मुळेचा लहितजवळील विसर्ग ६ हजार ९५१ क्युसेकवर आला होता.