Ahmednagar News : वादळवाऱ्याचा अहमदनगरमधील ‘या’ भागात कहर ! केळीबाग जमीनदोस्त

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मागील दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यामुळे अनेक भागात पडझड देखील झाली तर अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान देखील झाले. वादळी वाऱ्याचा फटका शेवगाव तालुक्यातील दहीगावने परिसरात देखील बसला.

या वादळाने शनिवारी (दि.११) येथील काही शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. ऐन आर्थिक संकटाच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

मागील आठवड्यात ढगाळ वातावरण, कधी हलका पाऊस तर अचानक अंगाची लाही लाही करणार वातावरण बघायला मिळाले. या विषम वातावरणात पिकांना अधिकची फवारणी आणि पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांना मेहनत घ्यावी लागली तसेच आर्थिक झळही सोसावी लागली.

अशा परिस्थितीतही येथील शेतकरी काशीद यांची दोन एकर केळीबाग व ओहळे यांची एक एकर केळीबाग अतिशय चांगल्या स्थितीत उभी होती. मात्र शनिवारी अचानक आलेल्या वादळाने क्षणात होत्याचे नव्हते झाले. तीन एकर केळीबाग जमीनदोस्त झाली.

रविवार सुटी आणि सोमवारी मतदान प्रक्रियेत व्यस्त असलेले महसूल विभागाचे कर्मचारी मंगळवारी पंचनामा करणार असल्याचे काशीद यांनी सांगितले. पंचनामा झाल्यानंतर तातडीने नुकसान भरपाई मिळाली तर खरिपाच्या तयारीला मदत होईल असेही ते म्हणाले.

मोठ्या कष्टाने आणि आर्थिक भार उचलून जोमदार केळीचे पीक आणले होते. ऐन केळी लागण्याच्या अवस्थेतच निसर्गाच्या लहरीपणाचा बसलेला फटका आर्थिक संकटात भर घालणारा आहे.

मात्र प्रशासनाकडून घटनेची योग्य दखल घेतली जाऊन नुकसान भरपाई मिळावी. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असताना पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी यामुळे मदत होईल अशी भावना नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe