Ahmednagar News : चैन स्नॅचिंग सारख्या अनेक घटना नगर शहरात घडत आहेत. महिला या चोरीमुळे काकुळतीला आलेल्या आहेत. परंतु आता या चोरांचा झटका पोलिसांनाच बसला आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या गळ्यातील दागिनेच चोरट्याने हिसकावले आहेत.
शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली. परंतु या घटनेनंतर दागिने हिसकावणाऱ्या दोघांना महिला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद उर्फ जॉनी उर्फ वीर जिजाबा उर्फ ओवाळ्या भोसले (वय १९), विशाल जिजाबा उर्फ ओवळ्या भोसले (वय १९, दोघे रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महिला पोलिस कॉन्स्टेबल मोहिनी कांबळे व त्यांची मैत्रीण दोघी साध्या वेशात बालिकाश्रम रस्त्याने निलक्रांती चौकाकडे किराणा दुकानात जात होत्या. त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी कांबळे यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले.
त्याबरोबर गळ्यातील ओढणी हिसकावली. कांबळे व त्यांच्या मैत्रिणीने दुचाकीचा पाठलाग करून अडविले. त्यानंतर जमाव गोळा झाला. त्या दोघांना धरून ठेवले. त्यांच्या ताब्यातील दागिने काढून घेतले. त्यानंतर तोफखाना पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले.
मोहिनी कांबळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तोफखाना पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यांना आज न्यालयात हजर केले असता न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.