Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, ते त्यांनी करू नयेत अन्यथा दि. ४ जून नंतर सर्व हिशब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा इशारा माजी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मला मदत केली असल्याने मी सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे.
पैसे कमविण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काही कमी पडत नाही, मी प्रस्थापितांच्या विरोधात सामन्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे. माझी प्रस्तापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे.
तसेच सुजय विखे यांचे नाव न घेता लंके म्हणाले लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्या मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते, पण जिवाभावाचे सामान्य लोक व सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे जाहीर सांगितले.
त्याचसोबत मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली आहे, कोणी कोणी मदत केली, हे आज जाहीर करणार नाही, पण निकालानंतर सर्व कळणार आहे. विरोधकांनी आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जात आहे, पण आम्ही गुंड नाहीत तर गरिबांना छळणाऱ्यांचा बंदोबस्त करून गुंडगिरी थांबविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
मी कमी शिक्षित असून, इंग्रजी येत नाही, असा आरोप झाला, पण मी आयटीआयचा साधा फिटर आहे, कोणता पान्हा कसा लावायचा, याचा खटका मला चांगलाच माहित असून, तो जुळवला आहे, ते आपणास लवकरच दिसेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
एकंदरीत लोकसभा निवडणुकी दरम्यान विखे व लंके यांच्यातील राजकीय राजकीय संघर्ष नगरकरांनी पाहिला आहे . आता निवडणूक संपल्याने हा संघर्ष देखील संपेल असे वाटत असतानाच लंके यांनी केलेले हे विधान म्हणजे हा संघर्ष यापूढे देखील चालूच राहणार असल्याची चिन्हे आहेत.