Ahmednagar News : विहिरीच्या खोदकामासाठी लावलेल्या जिलिटिनच्या कांड्यांचा अचानक स्फोट झाल्याने विहिरीत असलेल्या चार कामगारांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे घडली.
या घटनेत मृत्यू झालेल्या तिघांपैकी नागनाथ भालचंद्र गावडे (वय २९) हा तरुण कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील असून, सूरज युसुफ इनामदार (वय २७), गणेश नामदेव वाळुंज (वय २९), दोघे टाकळी कडेवळीत येथील रहिवासी आहेत. तर जब्बार सुलेमान इनामदार (वय ४५), वामन गेनाजी रणसिंग (वय ६५), रवींद्र गणपत खामकर (वय ५५), (तिघे रा. टाकळी कडेवळीत) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे बसस्थानकापासून काही अंतरावर शेडगाव रस्त्यावर वामन गेणा रणसिंग यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. काम करत असताना जिलेटीनचा स्फोट घडविण्यासाठी जॅकंबरच्या साहाय्याने खोलवर छिद्रे घेण्यात आली.
त्या छिद्रांमध्ये जिलेटीनच्या नळकांड्या भरण्यात आल्या. दरम्यान, साचलेले पाणी काढण्यासाठी कृषिपंप विहिरीमध्ये टाकला. कृषिपंप सुरू केल्यानंतर जिलेटीनचा स्फोट झाला.
या भीषण स्फोटात विहिरीत काम करणारे नागनाथ भालचंद्र गावडे, सूरज युसूफ इनामदार, गणेश नामदेव वाळुंज आणि जब्बार सुलेमान इनामदार हे चारजण विहिरीच्या बाहेर फेकले गेले, यात नागनाथ भालचंद्र गावडे, सूरज युसुफ इनामदार, गणेश नामदेव वाळुंज, या तीन कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर जब्बार इनामदार तसेच विहिरीच्या जवळ असलेले विहिरीचे मालक वामन रणसिंग आणि विहिरीचे काम पाहण्यासाठी आलेले रवींद्र खामकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली असून, घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलिस उप निरीक्षक समीर अभंग, संपत कन्हेरे, पोलिस कर्मचारी संभाजी शिंदे, अमोल मरकड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.