अहमदनगर जिल्ह्यातील काही शिक्षक चांगलेच अडचणीत येतील असे चित्र सध्या दिसत आहे. याचे कारण असे की, २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्व व घटस्फोटाचा आधार घेऊन बदलीचा लाभ घेतलेल्या ११८ शिक्षकांची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नगरच्या कोतवाली पोलिसांना दिली आहे.
आता कोतवाली पोलिस काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नगरमधील शिक्षक विकास भाऊसाहेब गवळी यांनी डिसेंबर २०२३ मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे जिल्ह्यातील आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात तक्रार केली होती.

ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. त्यांनी बदली झालेल्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मागितली. पोलिसांनी तसे पत्र डिसेंबर महिन्यात शिक्षण विभागाला दिले होते.
यामुळे आता जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीचा लाभ घेतलेल्या २०१७ ते २०२२ या कालावधीतील ११८ शिक्षकांची माहिती पोलिसांना सादर केली आहे. २०१७ पासून २०२२ पर्यंत आंतरजिल्हा बदलीमध्ये लाभ घेतलेले शिक्षक, त्यांची नावे, संवर्ग आणि बदलीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती शिक्षण विभागाने पोलिसांना दिलेल्या माहितीत दिलेली आहे.
याआधीही ७६ शिक्षकांवर कारवाई :- जवळपास ७६ शिक्षकांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन अपंग योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. तसेच त्याची याच आधारे आपल्या बदल्याही करून घेतल्या होत्या.
या प्रकरणी तपासाअंती सापडलेल्या दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात आली. हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. आता गवळी यांच्या तक्रारीवर पोलिस काय आणि कसा तपास करणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता ११८ शिक्षकांचे भवितव्य काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.