Ahmednagar news : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालात पारनेर तालुक्यातील ५ ही जिल्हा परिषद गटांमध्ये खासदार निलेश लंके यांना मतांची आघाडी मिळाल्याने लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य असलेल्या मावळते खासदार सुजय विखे यांना पराभूत केले.
जिल्ह्यातील सर्वांत मोठे प्रस्थ असलेले विखेंच्या घराण्यातील अलीकडच्या काळातील हा मोठा पराभव असून, तो ही एका सामान्य सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाने केल्याने राज्यात चर्चिला गेला आहे. निलेश लंके यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सर्वच तालुक्यांमधून मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. पारनेर तालुका हा त्यांचा गृह तालुका. या तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे निघोज या गावावर त्यांची खास मेहरनजर असल्याने त्यांनी आमदारकीच्या साडेचार वर्षाच्या कालखंडात पारनेर तालुक्यात सर्वांत जास्त ६० ते ८० कोटी रुपयांची विकासकामे एकट्या निघोज परिसरात केली.
त्याचबरोबर त्यांनी जवळा, गुणोरे, कोहोकडी, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, वडगाव गुंड, वडनेर, शिरापूर, अळकुटी, पाबळ, कळस, गारखिंडी, रांधे, दरोडी, लोणी मावळा, या गावांच्या मतदान आकडेवारीत खा निलेश लंके यांना मिळालेले मताधिक्य पाहता, निघोज अळकुटी जिल्हा परिषदेच्या गटात खा. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध होते.
त्यांनी साडेचार वर्षात विधानसभा सदस्य असताना उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या माध्यमातून पारनेर नगर विधान सभामतदार संघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणल्याने त्यांना त्याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने झाल्याचे मान्य करावे लागेल. त्यांना आमदार असताना विकासकामे करताना थोड्या मर्यादा येत होत्या, पण त्यांना आता जनतेने खासदार म्हणून निवडून दिल्याने ते आता राज्या बरोबरच केंद्राचाही निधी खेचून आणतील. निधी मंजूर करून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे.
खा. लंके यांनी निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटात इतर प्रश्नांबरोबरच लोकांचे व्यक्तीगत प्रश्न सोडविण्यार प्राधान्य दिले त्यांचेलोकोपयोगी कार्य निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केले. लंके यांना या गटातून २० हजार २५१ मते मिळाली, तर विखे यांना ९ हजार ९५४ मते मिळाली.
यावरून या गटावर लंके यांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते. लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांचा तसा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संपर्क आहे. लंके यांच्या विजयात त्यांच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी प्रामाणिकपणे स्वतः ला झोकून देऊन काम केल्याने लंके यांचा विजय सुकर झाला.