Ahmednagar News : दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघे मित्र शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. त्यातील एक मूकबधिर होता. दुसरा मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तो पुन्हा वर आलाच नाही. आपला मित्र बुडालाय ही बाब मूकबधिर मुलाच्या लक्षात आली.
त्याने लगेच हातवारे करून आजूबाजूला असलेल्यांना मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. मात्र, कोणालाच काही समजेना. अखेर त्या मूकबधिर मुलाच्या आई-वडिलांना तो काय म्हणतोय ते समजले आणि ते शेततळ्यावर पोहोचले. मात्र, तोपर्यंत त्याचा मित्र शेततळ्यातील चिखलात रुतून बसला होता. बाहेर काढेपर्यंत त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथील रेल्वेलाइन शेजारी खोदलेल्या शेततळ्यातील. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा), असे शेततळ्यातील चिखलात रुतून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. समीर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. सोमवारी (दि.१) दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि त्याचा मित्र दोघे शेततळ्यात पोहायला गेले. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मोठी दलदल झाली होती.
शेततळ्याशेजारी राहणाऱ्या तरुणांनी पाण्यात उड्या मारून समीरचा शोध घेतला. जाळी लावली आणि तेथेच समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मात्र, वेळ जास्त गेल्याने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. समीरने पाण्यात उडी मारली, परंतु तो बाहेर आलाच नाही.
कारण उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतून बसला. तो बाहेर येईना ही बाब त्याच्या मूकबधिर मित्राला कळाली. समीर पाण्यात बुडाला आहे, असे तो शेजारी असणाऱ्यांना हातवारे करून सांगत होता. परंतु त्याला काय सांगायचे आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. नंतर त्याच्या आई-वडिलांना त्याने केलेले हातवारे, खुणा समजल्या. त्यांनी सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली पण तो पर्यंत दुर्घटना घडून गेली होती.