कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटींची मान्यता : आमदार आशुतोष काळे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती.

पुढील प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेऊन कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटींच्या प्राथमिक अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

मतदार संघातील नागरिकांना दुर्धर आजारावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी जवळपास १०० किलोमीटर अंतर पार करून जावे लागते.

एवढे मोठे अंतर पार करीत असतांना अंत्यवस्थ रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. कोपरगाव येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने मोठी मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी वारंवार मागणी केली होती.

कोरोनाच्या जीवघेण्या महामारीने आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी ३० बेडच्या असलेल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू होता.

त्या पाठपुराव्यातून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्राथमिक अंदाजपत्रक आराखड्यास महाविकास सरकारने २८.८४ कोटीची प्रशासकीय मान्यता दिली.

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe