अहमदनगरमधील ‘या’ गावात गावठी दारू पिल्याने मृत्यू? संतप्त महिलांचा ‘राडा’, दारूअड्डे उद्ध्वस्त

नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनविलेल्या गावठी दारुच्या सेवनामुळे एकाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन संतप्त महिलांनी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील अवैध दारूअड्डे उद्ध्वस्त केले. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास अंत्यविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता.

Ahmednagarlive24 office
Published:
daru

Ahmednagar Breaking : नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनविलेल्या गावठी दारुच्या सेवनामुळे एकाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन संतप्त महिलांनी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील अवैध दारूअड्डे उद्ध्वस्त केले. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास अंत्यविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता.

पोलिसांच्या आश्वासनानंतर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की उक्कलगाव येथील ज्ञानेश्वर मोडे यांनी काल मंगळवारी (दि. २) गावातील एका दारू अड्ड्यावर जाऊन गावठी दारुचे सेवन केले.

त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नातेवाईकांनी पैसे जमा करून त्यांना उपचारासाठी स्थानिक डॉक्टरकडे दाखल केले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हे समजताच गावातील महिला, नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी संघटीत होऊन दारूअड्ड्याकडे आपला मोर्चा वळविला.

महिलांनी शाळेच्या भिंतीलगत सुरु असलेल्या एका अड्ड्यावर जाऊन तोडफोड केली. त्यातील सर्व सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले. काही वेळातच गावातील महिला व पुरुष जमा झाले. तेव्हा बेलापूर पोलीस चौकीचे हवालदार बाळासाहेब कोळपे हे उक्कलगावात दाखल झाले.

त्यावेळी संतप्त महिलांनी गावातील सर्व दरूअड्डे तातडीने बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली. गावात कुठे कुठे दारू अड्डे सुरू आहेत, याची पाहाणी करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी गावात अनेक ठिकाणी दारु अड्डे सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला.

यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्याची झाकने आढळून आली. ते पाहून महिलांच्या भावनांचा उद्रेक झाला. गावठी दारु विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा नेत त्यांनी गावठी दारुच्या दुकानाची मोडतोड केली.

दारु अड्डे शाळेच्या भिंतीलगतच सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी याप्रसंगी केला. गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन कायमस्वरुपी अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव करू, असे आश्वासन महिलांना दिले.

काल मंगळवारी मोडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र प्रत्यक्षात पंचनामा केल्यानंतर मुत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. माझ्यापर्यंत त्यांचे कोणीही नातेवाईक आलेले नसल्याचे उक्कलगाव आरोग्य उपकेंद्राचे डॉ. शंशाक जैन यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe