Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर लग्नही करण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला नंतर गुंगीचे औषध देऊन दुसऱ्याकरवी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
तशी फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुख्य आरोपी असलेल्या पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील आणखी एक आरोपी फरार झाला आहे.

अधिक माहिती अशी: दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर पीडिता परिचारिका असून त्याच रुग्णालयात नोकरीस असलेल्या आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या मोहम्मद इम्रान नजारूल हसन याच्याशी तिची मैत्री झाली. दिनांक १८ जुलै २०१४ रोजी कामानिमित्त अहमदनगर येथे गेली असता, इम्रानने तिला पाइपलाइन रोडवरील त्याच्या फ्लॅटवर नेले व तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले. त्याचे मोबाईलमध्ये फोटोही काढले.
आणि आता माझ्यासोबत लग्न करावेच लागेल, अशी गळ घातली. दुसऱ्या दिवशी (१९ जुलै २०१४) इम्रानने तिला फोन करून आधार कार्ड व फोटो घेऊन पुन्हा नगरला बोलावले. विवाह नोंदणी कोर्टात गेला; परंतु साक्षीदार नसल्याने विवाह नोंदणी न करता पुन्हा फ्लॅटवर नेले. ‘आता तू घरी न जाता इथेच राहा,’ असे सांगितले. त्यामुळे तिने फोन करून, ‘आपण इम्रानबरोबर लग्न केले,’ असे आईला सांगून टाकले.
त्यानंतर दिनांक २० जुलै २०१४ रोजी एकवीरा चौकातील प्रार्थनास्थळात त्याच्या ओळखीच्या चार-पाच जणांच्या साक्षीने इम्रानसोबत तिचा ‘निकाह’ करण्यात आला. नंतर दोन-तीन दिवसांनी इम्रानने तिला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद संबल येथील त्याच्या घरी नेले.
तेथेही दोन-तीन दिवस राहिले. मात्र नंतर ‘पवित्र’ झाल्याचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच तुला आमच्यासोबत उठता-बसता येईल, असे सांगून तिला तेथेच ठेवून तो एकटाच नगरला परतला.
तेथील प्रार्थनास्थळातून तिला सर्टिफिकेट दिल्यानंतर महिन्याने इम्रानने तिला घोडेगाव (ता. नेवासा) येथे आणले. तेथे भाडोत्री घरात ते राहत असतानाच त्यांना दोन मुली झाल्या. दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये ही तरुणी आजारी असताना इम्रान तिला औषधी गोळ्या देत असे.
या गोळ्या घेतल्यानंतर तिला गुंगी येई. त्या वेळी इम्रानसोबत येणारी एक अनोळखी व्यक्ती शरीरसंबंध प्रस्थापित करत असल्याची जाणीव तिला झाली. तिने इम्रानला विचारले असता त्या दोघांत वाद झाल्यानंतर ती दोन्ही मुलींना घेऊन आई-वडिलांकडे गेली.
या तरुणीच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी मोहंमद इम्रान नजारुल हसन याच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून इम्रानला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.