गुटखा लूट प्रकरण पोलिसांना भोवणार; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे चौकशीचे आदेश

Ahmednagarlive24 office
Updated:

अकोले : कर्नाटकातून महाराष्ट्रात अन्‌ थेट अकोल्याच्या दिशेने निघालेला पकडलेला व नंतर तडजोड करून सोडून दिलेला गुटख्याचा ट्रक संबंधित पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये गुट्खा बंदी असतानाही छुप्या पद्धतीने गुटखा राज्यात आणून विकला जातो.

प्रत्येक गावात शहरात, खेड्यात गुटखा मिळतो. याकडे पोलीस व अन्न वब औषध प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. नुकतीच कर्नाटकातून गुटख्याने भरलेली ट्रक अकोले येथे धामणगावच्या दिशेने जाण्यासाठी आली होती.

ती अकोले तालुक्‍यात घारगाव ते बोटादरम्यान काही जणांनी लुटली. यात सुमारे २० लाखांपेक्षा जास्त किंमतीचा माल होता, असे समजते. ही गाडी लुटण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याला समजले.

त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तातडीने संगमनेरात दाखल झाले. त्यांनी ही गाडी लुटणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले; परंतु जिल्ह्यातील एका मोठ्या गुटखा विक्रेत्याच्या मध्यस्थीने त्यांना सोडून देण्यात आले.

विशेष म्हणजे हे पथक सरकारी गाडीने नव्हे, तर एका खासगी गाडीने तेथे आले होते. या न झालेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

या प्रकरणाची चोकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोल्यात असाच अवैध गुट्खा पकडला होता; परंतु कुठलीही कारवाई न करता तो सोडून दिल्याचीही चर्चा आहे . यामध्ये लोकप्रतिनिधींनीही तक्रार केली होती; पण याचे पुढे काय झाले? हाही प्रश्‍न उनुतरीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe