अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Published on -

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या नोंदीनुसार, सन २०२३ मध्ये ४४६ गुन्हे दाखल झाले होते, तर २०२४ मध्ये हे प्रमाण वाढून ५२८ वर गेले आहे. विशेषतः महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. २०२३ मध्ये विनयभंगाचे २२ गुन्हे होते, २०२४ मध्ये हे प्रमाण दुप्पट होऊन ४५ वर गेले आहे.

महिला व तरुणी पळवून नेण्याचे २२ गुन्हे नोंदवले गेले असून, या घटनांमध्ये सातत्य दिसत आहे. बलात्काराचे २०२३ मध्ये १, तर २०२४ मध्ये ५ गुन्हे दाखल झाले आहेत. बाललैंगिक शोषणाच्या १६ घटनांपेक्षा २०२४ मध्ये १३ गुन्हे नोंदवले गेले आहेत. अकोले तालुक्यातील एका महाविद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, एका पाच वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलांचे आरोग्यही मोठ्या संकटात असून, गेल्या आरोग्य तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या सरकारी योजना राबवल्या जात असल्या तरी त्या फक्त कागदावरच असल्याची वस्तुस्थिती आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असून, शाळांमध्ये मुलींसाठी समुपदेशन वर्ग सुरू करावेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

समाजाची मानसिकता बदलण्याची गरज

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने होत असणारी वाढ ही अत्यंत चिंताजनक आहे. महिलेवर अत्याचार झाल्यावर गुन्हा दाखल होतो, पण तिला न्याय मिळतो का? हा गंभीर प्रश्न आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. – प्रतिभा कुलकर्णी, एकल महिला समिती, अकोले

बालविवाह व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

तालुक्यात बालविवाहाचे प्रमाणही वाढते आहे. मुलींच्या सुरक्षेच्या भीतीने पालक अल्पवयात लग्न लावून देत असल्याचे समोर आले आहे. दारिद्रय, मागासलेपण आणि अंधश्रद्धा ही देखील बालविवाहाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शिक्षणातील गळतीचे प्रमाण

महिला शिक्षणाच्या गळतीचे प्रमाणही मोठे असून, इयत्ता पहिलीत प्रवेश घेणारी प्रत्येक मुलगी १२वी पर्यंत पोहोचते का, याची आकडेवारी तपासल्यास मोठी संख्या शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे स्पष्ट होते.

महिलांनी पुढे यायला हवे

महिला व तरुणींना कायद्याची संपूर्ण माहिती नसली तरी जुजबी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा अत्याचारांना महिला व तरुणी बळी पडणार नाहीत. महिलांनी अन्याय सहन न करता पुढे यायला हवे. – अॅड. मंगला हांडे, अध्यक्ष महिला पतसंस्था , अकोले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe