८ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता देखील माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली,असे मनोगत विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत स्व. पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने त्यांचे नाव निळवंडे धरणाला द्यावे,असा ठराव येथे आयोजित सर्वपक्षीय अभिवादन सभेत नुकताच करण्यात आला.या ठरावास सर्व उपस्थित मान्यवर व नागरीकांनी पाठींबा दिला.माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांचे एक महिण्यापूर्वी निधन झाले.
त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्या वतीने अकोले महाविद्यालयात नुकतीच शोकसभा आयोजित करण्यात आली होती.या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत होते.
यावेळी माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या सान्निध्यात आलेल्या अनुभवांचा आढावा घेताना स्व. मधुकरराव पिचड हे क्षमाशील व्यक्तीमत्व होते.त्यांनी तालुक्यात लोकशाही जीवंत ठेवली.त्यांनी कधीही व्यक्तिगत द्वेष ठेवला नाही.पिचड कुटूंब हे कधीही कोणासाठीही उपद्रवी झाले नाही.
प्रशासनावर वचक असणारे नेते म्हणजे पिचड होते.पिचड हे शारीरिक उंचीने कमी होते.मात्र कर्तृत्वाने ते कळसुबाई शिखरपेक्षा मोठे होते.त्यांनी अकोले तालुक्यात कायम जातीय सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न केले.अकोले तालुक्यातील विकासासाठी राज्यात धोरणे घेणारा नेता पुन्हा होणे नाही.
त्यांच्या दशक्रिया विधीला राज्यातील नव्हेतर देशातील अनेक नेते उपस्थित राहून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.या बाबीवरून पिचड यांची राजकीय उंची लक्षात येते.सलग ४० वर्षे माजी मंत्री पिचड यांच्यासोबत तालुक्यातील जनता राहिली आहे.ही बाब पिचड यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणावा लागेल,अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकरी ज्येष्ठ नेते दशरथराव सावंत, कारभारी उगले, जे. डी. आंबरे, भाऊपाटील नवले, परबतराव नाईकवाडी, शरदराव देशमुख, वकील वसंतराव मनकर, शरदराव चौधरी, यशवंतराव आभाळे, सीताराम देशमुख, सीताराम भांगरे, उमेश डोंगरे, भानुदास तिकांडे, अरुण रुपवते, माधवराव तिटमे, मारुती मेंगाळ, प्रा. विवेक वाकचौरे, अर्शद तांबोळी आदींनी मनोगत व्यक्त करीत स्व. मधुकरराव पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी मनोगत व्यक्त केले.आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. नितीन आरोटे व प्रा. विवेक वाकचौरे यांनी सूत्रसंचलन केले.अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी आभार मानले.दरम्यान,अगस्ती महाविद्यालय येथे स्व. मधुकरराव पिचड यांनी केलेल्या कार्याचे कायम स्मरण होण्याच्या दृष्टीने संग्रहालय व स्व. पिचड यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी सांगितले.