पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप परिसरात दहशत माजविणारा दुसरा बिबट्या जेरबंद !

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप, गुरेवाडी, भोरवाडी कन्हेर, या आदिवासी ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

म्हसोबा झाप भागात मांडओहळ हे धरण व वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबटे आहेत. बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला वावर लक्षात घेता या भागात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केलेल्या पाठपुराव्याने वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले होते.

गेल्या आठ दिवसांत दोन बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. भोरवाडी येथील भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये हे दोन्हीही बिबटे पकडण्यात आले आहेत. तरीही या भागामध्ये अजूनही बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजून बिबटे या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील आठवड्यात भोरवाडी येथील शेतकरी अशोक निकम यांच्या गायीवर हल्ला करत बिबट्याने फडशा पाडला होता. पाळीव कुत्र्यांवरही बिबट्याने हल्ला केला आहे. या भागातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित दखल घेत या भागात पिंजरे लावून आत्तापर्यंत दोन बिबटे जेरबंद केले आहेत.

अजूनही या भागात बिबट्या असल्याने वनविभाग सतर्क आहे. म्हसोबा झाप परिसरामध्ये जंगल सदृश्य व डोंगराळ भाग असल्याने या भागात अनेक हिंस्र प्राणीसुद्धा आहेत, त्यामुळे या भागातील भय कधी संपत नाही, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या भागात ग्रामस्थ बाहेर पडण्यास घाबरतात.

टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन म्हसोबा झाप परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाळत ठेवून पिंजरा लावत भोरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये दोन बिबटे जेरबंद केले आहेत, वन विभागाच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe