पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पळ काढण्याच्या मानसिकतेत; विखेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पुन्हा पळ काढण्याच्या मानसिकतेत दिसते. तसेच राज्यातील कोणत्याच प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारची नसते.

अशी टिका माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राहाता येथील विश्रामगृहात जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आ. विखे पाटील म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्य विधीमंडळाचे एकही अधिवेशन मोठ्या कालावधीचे झाले नाही.

यापूर्वी कोविड परिस्थितीचे कारण देत सरकारने कमी कालावधीचे अधिवेशन घेतले. अशी खंत विखेंनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना विखे म्हणले कि, राज्यात कोविड संकटानंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्‍यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही.

सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली. परंतु दोन लाख रुपयांच्या पुढे कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर करूनही मिळालेले नाही.

महिला अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रश्न समोर आले आहेत.

यामध्ये काही अधिकारी अडकले असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले की, या सर्वच प्रश्नावर अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे आहे.

परंतु सरकारला अधिवेशन होवू द्यायचे नाही याच मानसिकतेत असल्याने मागील अनेक अधिवेशन अशीच सरकारने गुंडाळली असल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe