अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्या भिमराज नामदेव शिंदे (वय 48 रा. बाभुळखेडा ता. नेवासा, हल्ली रा. रामवाडी, शिंगवे नाईक ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांनी भादंवि कलम 363 अन्वये दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी की, या खटल्यातील फिर्यादीचा मुलगा व त्याची पत्नी हे 11 जुलै 2013 रोजी पाहुण्यांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते.
तसेच फिर्यादी यांची मुलगी व जावई हे देखील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या दोन्ही अल्पवयीन नाती घरी होत्या.
फिर्यादी यांचे जावई व मुलगा घरी आले असता त्यांना मुली घरी दिसल्या नाहीत. त्यांनी फिर्यादीकडे चौकशी केली असता, त्या त्यांच्याकडेही नव्हत्या.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुली हरवल्याबाबत फिर्याद दिली. दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध सुरू असताना त्यांना माहिती मिळाली की, भिमराज शिंदे व त्यांचा अल्पवयीन मित्र घरातून निघून गेले आहेत.
फिर्यादी यांच्या दोन्ही नातींना शिंदे व त्याच्या मित्राने काहीतरी फुस लावून पळवून नेले असल्याची खात्रीशीर माहिती फिर्यादी यांना मिळाली होती.
पोलिसांनी शोध घेतला असता फिर्यादी यांच्या नातीं बाभुळखेडा येथे मिळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी शिंदे व त्याच्या अल्पवयीन मित्राने लग्नाचे अमिष दाखवून पळवून आणल्याची कबूली फिर्यादी यांच्या नातींनी दिली.
सदर घटनेबाबत आरोपीविरूध्द भादंवि कलम 363, 366 (अ), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एल. एम. गवंड यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांच्यासमोर झाली. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.
सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, पीडित मुलीची आई, पीडित मुली व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदी पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकिल दिवाणे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शिंदे याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सरकारी वकिल दिवाणे यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार एकनाथ जाधव यांनी मदत केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्रा