इतिहास घडविणाऱ्या पराक्रमी पुरूषांचे वास्तव्य लाभलेल्या कोपरगावातही विकासकामे करा : खा. वाकचौरेंना निवेदन

Mahesh Waghmare
Published:

२९ जानेवारी २०२५ कोपरगाव : सन २०२७ मध्ये नाशिक सिंहस्थाच्या विकास कामात कोपरगावाचाही विकास कृती आराखड्यात समावेश करावा,अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी शनिवारी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेवून दिले.याबाबत सकारात्मकता दाखवून खा.वाकचौरे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबत झावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामायण, महाभारतातील प्रसंगाचे दाखले देणारा दंडकारण्याचा भाग म्हणजे कोपरगाव तालुका आहे.साधू, संत, पीर, फकीर, अवलिया यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला गोदाकाठ परिसर, इतिहास घडविणाऱ्या पराक्रमी पुरूषांचे वास्तव्य लाभलेला भाग म्हणजे कोपरगाव तालुका आहे.

कोपरगाव तालुक्याला व शहराला दक्षिण काशी व दक्षिण वाहिनी पवित्र गंगा गोदावरी नदीमुळे या ठिकाणामुळे पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कथा व अख्यायिका सर्वश्रुत आहे. व आपणास ही माहित आहे. त्यांचे साक्षी व पुरावे आजही येथे पहावयास मिळतात.या सर्व नोंदी शासन दप्तरी आहे.तसेच दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक पवित्र गंगा गोदावरी स्नानासाठी व शुक्राचार्य, कचेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. तसेच दर १२ वर्षानी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक येथे येणारे सर्वच भाविक हे कोपरगाव येथे आवर्जून येत असतात.

अशा धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक कोपरगाव शहराच्या मधोमध पवित्र गंगा गोदावरी नदी वाहत आहे. भाविकांसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला अंदाजे ३० कि.मी. घाट बांधणे आवश्यक आहे. तसेच शहराच्या आजु-बाजूच्या गावाचे सांडपाणीमुळे नदी पात्र व पाणी प्रदूषित होते.ते सांडपाणी शुद्ध करून पुन्हा नदी पात्रामध्ये सोडणे आवश्यक आहे. तसेच वरील प्रमाणे पौराणिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिराचा परिसर सुशोभिकरण करणे व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अशा मागण्या निवेदनात केल्या आहे.

या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या असून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नाशिक विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देखील निवेदन देण्यात येणार आहे, असे झावरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe