गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- दोन वाहनांमधून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार्‍या अकरा गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. सोमवारी (ता.14) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील येवला नाका येथे ही कारवाई करण्यात आली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दोन वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना समजली.

त्यानुसार पोलिसांनी कोपरगाव शहरातील येवला नाका येथे पिकअप (क्र.एमएच.10, एक्यू.0115) व दुसरी पिकअप (क्र.एमएच.17, बीवाय.2692) ही वाहने पकडली. या वाहनांतून 83 हजार रुपयांची लहान-मोठी गोवंश जनावरे ताब्यात घेतली.

या प्रकरणी पोलीस नाईक दिगंबर शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रियाज शक्करजी शेख, फिरोज फकीर कुरेशी (दोघेही रा.खंडाळा, ता.वैजापूर), रवींद्र सूर्यभान माळवदे व शरद रामदास पोटे (दोघेही रा.धोत्रे, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुरनं.58/2022 महाराष्ट्र पशुक्रूरता अधिनियम कलम 11 अ, ड, ई, फ, महाराष्ट्र पशु वाहतूक अधिनियम 47, मोटार वाहन कायदा कलम 183/187, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी 83 हजार रुपयांची अकरा गोवंश जनावरे आणि 3 लाख रुपयांच्या दोन पिकअप असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. आर. तिकोने हे करीत आहे. या कारवाईबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे. यापुढेही कारवाईत असेच सातत्य ठेवावे, असा सूरही नागरिकांतून उमटत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe