आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी

Karuna Gaikwad
Published:

११ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे.

त्यामुळे आमदार आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याचे चित्र सोमवारी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात दिसून आले.कोपरगावातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आमदार काळे यांनी सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला.

सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग, भूमी अभिलेख, वनविभाग व शेती महामंडळ ह्या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या.

या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी सबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले.आमदार आशुतोष काळे म्हणाले, शासकीय कार्यालयात आपल्या अडचणी व प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांना सर्व बाबतीत सखोल माहिती असते असे नाही. त्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रश्न व अडचणी तातडीने सुटावे, यासाठी नागरिकांना समजून सांगावे.

नागरिकांनी देखील आपल्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी. जनता दरबार नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, गटविकास अधिकारी संदीप दळवी, भूमी अभिलेख विभागाचे डावरे, वन विभागाचे सानप, शेती महामंडळाचे जोंधळे आदींसह शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार सुरूच राहणार

अधिकारी व नागरिकांनी एकमेकांशी सुसंवाद साधून प्रश्न शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्यावी. मी जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढे देखील जनता दरबार सुरूच राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe