कोपरगाव येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांच्या संगनमताने पालिकेचा कारभार करीत असून त्यांचा मनस्ताप मात्र कोपरगावकरांना भोगावा लागत असल्याचा आरोप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काल बुधवारी (दि. १३) जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याशी बोलताना केला.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाल्या की, शहराचे आरोग्याचे रक्षक म्हणून नगरपालिकेकडे पाहिले जाते. परंतु गेल्या दिड-दोन वर्षांपासून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची काम करण्याची कार्यालयीन वेळ म्हणजे सायंकाळी पाच वाजेनंतर असते,

त्यानंतर काय गोष्टी तिथे चालतात हे आपण मागच्या मिटिंगमध्ये प्रत्यक्ष पालकमंत्री, प्रांताधिकारी व आपल्या सर्वांसमोर वारंवार मांडलेले आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी सुद्धा समोर बसलेले होते. याची आठवण त्यांनी जिल्हाधिकारी यांना करून दिली.
याप्रसंगी कोल्हे पुढे म्हणाल्या की, मुख्याधिकारी हे कधीच ऑफिसला बसत नाही ते केवळ सोईपुरते व लाभापुरतेच ऑफिसमध्ये येतात. पालिकेतील सर्व विभाग बंद झाल्यानंतर संध्याकाळी लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहाय्यकाच्या संगनमताने मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांचा रात्रीस खेळ चालतो.
त्यामुळे नगरपालिका कारभार हा संशयाच्या गर्तेत सापडला असून ‘रात्रीस खेळ चाले’ अशी या प्रशासनाची ख्याती झाली आहे.
लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने पालिकेचा मुख्याधिकारी वारंवार जनतेला वेठीस धरत असेल आणि त्याच्याबरोबर वाटाघाटी करून लोकप्रतिनिधीचा स्वीय सहाय्यक मदत करीत असल्याने त्याचे परिणाम आज कोपरगावची जनता भोगत आहे.
वारंवार याबाबत आपल्याला सांगितले. परंतु आपल्याकडूनही दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत कुंपणच शेत खाऊ लागले तर जनतेने जायचे कुणाकडे आम्ही किती सहन करायचे, असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला.