शेतकऱ्यांच्या तक्रारी नको : आ. लंघे यांनी पहिल्याच बैठकीत टोचले अधिकाऱ्यांचे कान !

Sushant Kulkarni
Published:

३ जानेवारी २०२५ नेवासा : माझ्याकडून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्रास होणार नाही. मात्र तालुक्यातील कुठल्याही प्रशासकीय कार्यालयाबाबत शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरीकांच्या तक्रारी नको, अशा सूचना देत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिल्याच बैठकीत कान टोचले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल गुरुवारी (दि. २) तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, प्रमुख कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संजय लखवाल, मुख्यअधिकारी सोनाली मात्रे, उपअभियंता सुरेश दुबाले यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली पेचे, युवा नेते ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, प्रदिप ढोकणे, गणेश लंघे, आदिनाथ पटारे आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील महसूल, पोलीस यंत्रणा, पंचायत समिती, नगरपंचायत, दुय्यम निबंधक, मुळा पाटबंधारे, भूमी अभिलेख, एसटी महामंडळ, वीज वितरण कंपनी, जीवन प्राधिकरण विभाग, पशुसंवर्धन, जलजीवन, अशा एकूण २२ विभागाची बैठक घेण्यात आली. यात सामान्य नागरीकांच्या तक्रारी व शासकीय योजना, नवीन कार्यालय प्रस्ताव तसेच विविध अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

यावेळी लंघे म्हणाले की, काळात अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्या. त्या पुढील काळात सुधारणा झाल्या पाहिजेत. विविध विभागाचे अधिकारी नागरीकांना त्यांचे काम घेवून आले असता, कार्यालयात भेटत नाहीत. नागरीकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. त्यामुळे यापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतात बदल करावा. जुन्या कामाचा निपटारा करा. आजच्या पहिल्या बैठकीत अधिकारी सोबत साधक-बाधक चर्चा झाली.यात अतिशय समर्पक, अशी उत्तरे मिळाली.

काम करताना अधिकारी यांच्या देखील अडचणी असतात. दोन्ही बाजू जाणून घेणे हे माझे काम आहे.यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करेल, भविष्यात हातात हात घालून आपण सर्वजण कामे करू, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून प्रमुख कार्यालयातील रिक्त पदे भरून काढू, जनतेला त्रास म्हणजे मला त्रास, आता जनता ही माझी जबाबदारी आहे.भविष्यात चांगले कामे होतील, हिच नूतन आमदार म्हणून अपेक्षा व्यक्त करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe