अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ भ्रष्ट आणि सर्वच समाजघटकांची फसवणूक करणारा ठरला.
जनादेश डावलून सतेवर आलेल्या या सरकारचा समान कार्यक्रम हा फक्त वसुलीचा होता, हे आता लपून राहिलेले नाही. शेतकऱ्यांची पोरं म्हणून मिरवून घेणारेच बांधावर जाऊन शेतकऱ्यांची वीज तोडत असल्याची घणाघाती टीका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
रविवारी लोणी येथे पत्रकार परिषदेत आ. विखे बोलत होते. ‘मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री’ असल्याचे सांगणाऱ्यांनीच शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही.
कवडीमोल मदत आता खात्यात वर्ग केली; परंतु लगेच या वसुली सरकारने वीजबिलाच्या शेतकऱ्यांना नोटीसा पाठविल्या. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरविणारे आता बांधावर जाऊन शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेचे काय झाले?
राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही खरच मदत केली असेल, तर त्याची श्वेतपत्रिका काढा. या सरकारच्या कार्यकाळात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कोणताही समाज घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले.
आरोग्य भरतीत घोटाळा झाला. एसटी कामगार आझाद मैदानात बसले. शेतकरी वीज वितरण कंपनीच्या दारात दिसत आहेत. कृषी मंत्रीच पीक विमा कंपन्यानी चार हजार कोटी रुपयांचा नफा मिळविल्याची कबुली देत असतील, तर हे राज्याचे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त केले.
राज्यातील एसटी कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करून अनिल देशमुखांबद्दल सहानुभूती दाखविणारे नेते कामगारांच्या संपाबाबत शब्दसुद्धा काढत नाहीत.
कामगारांच्या संपावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांची कोंडी केली असून शिवसेनेचा मराठी बाणा आता कुठे गेला? असा थेट सवाल त्यांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम