७ जानेवारी २०२५ राहाता : गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करून सिंचनासह दुष्काळी समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, महायुती सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक आणि उन्हाळ्यासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या सल्लागार समितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. आशुतोष काळे, आ. हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाने, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात नवीन पाणी निर्माण करून या भागाचा दुष्काळ संपवण्यावर भर दिला जाईल. कालव्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी हे ब्रिटीशकालीन कालवे दुरुस्त करण्याची मोठी गरज आहे.यासाठी महायुती सरकारने १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल,असेही त्यांनी सांगितले.गोदावरीच्या लाभक्षेत्रात बिगर सिंचनाचे आरक्षण ५२ टक्के असल्याने अतिरिक्त पाणी निर्माण करणे आवश्यक आहे. विभागाने पुढील १७० दिवसांमध्ये ९० दिवस कालव्यांमधून पाणी उपलब्ध होईल असे सूक्ष्म नियोजन केले आहे.
पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत आ. आशुतोष काळे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, विवेक कोल्हे यांनीही सूचना केल्या.जलसंपदा विभागाने केलेल्या आवर्तनाच्या नियोजनाची माहिती अभियंता राजेश गोवर्धने यांनी सादर केली. मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या ठोस उपक्रमांमुळे गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सांडपाणी बारमाही मिळेल
शिर्डी नगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते चारी क्रमांक ११, १२, १३ मध्ये सोडण्याचे नियोजन असून, यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध होईल. पिंपळवाडी चारी क्रमांक १४ साठी स्वतंत्र पाईपलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.