शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर मंत्री विखे पाटील यांची टीका : शिर्डीच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजण्याचे आदेश

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : “कोणतेही विधान करताना खासदार राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठून लावला ? हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते चुकीची विधाने करून जनते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

खासदार राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जनादेशाचे खरे दुःख त्यांना आहे. जिल्ह्यातही सामान्य लोकांनी प्रस्थापितांना घरी बसवले, याचा विसर राहुल गांधी यांना पडला आहे.”

शिर्डीत नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेबाबत बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहराच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निर्देश देण्यात आले आहेत.

” शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाणार असून,गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,असे आदेशही त्यांनी दिले.

तसेच,आजच्या घटनेत पोलिसांचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.सांयकाळी उशिरा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपअधीक्षक वमने, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश दिघे, कैलास कोते, विजय जगताप, कमलाकर कोते, सचिन शिंदे, नितीन कोते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चुका आणि सुधारणा यांचा आढावा घेण्यात आला.शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय गुप्तपणे सुरू असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

बैठकीतील महत्वाचे निर्णय

अवैध व्यवसाय आणि वाहतूक नियंत्रण रात्री उशिरा शहरात फिरणाऱ्या संशयितांवर आणि अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार.पोलीस बंदोबस्त वाढवणार मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत बदल करून,तिथले पोलीस आता शहराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार.

संस्थान सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था: साई संस्थानने त्यांच्या परिसराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा वापरण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.या निर्णयांमुळे शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.