मोठी बातमी ! बनावट गाय छाप तंबाखू विकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- संगमनेरातील गाय छाप तंबाखूचे हुबेहुब बनावटीकरण करुन ते बाजारात विकणारी आंतरराज्य टोळी सोलापूर पोलिसांनी उघड केली आहे.

या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गाय छाप तंबाखू बनविण्यासाठी लागणार्‍या साहित्यासह सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत सोलापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे सोलापूर प्रतिनिधी कैलास सोमाणी (रा.सोलापूर) यांना नियमीत भेटी दरम्यान मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावातील एका दुकानात बनावट गाय छाप तंबाखूचे पुडे आढळून आले.

त्यावरुन त्यांनी अधिक माहिती घेतली असता उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एक इसम कंपनीचा अधिकृत ट्रेडमार्क असलेला लोगो वापरुन बनावट गाय छाप तंबाखू तयार करण्यासाठी हुबेहुब छपाई केलेले लेबल लावून कंपनीची फसवणूक करत असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सुरु असताना पोलिसांनी आग्रा येथून मनोजकुमार उर्फ हिमांशू या इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तांत्रिक तपास करुन

या प्रकरणाचा मास्टर माईंट रमेशकुमार गुप्ता (रा.गोंदिया) याच्या ठिकाणावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा घातला. तेथून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गाय छाप तंबाखू तयार करण्यासाठीचे लेबल, पाकीटे, सुटी तंबाखू, इलेक्ट्रिक वजनकाटा,

तयार करुन ठेवलेले गाय छाप तंबाखूचे पुडे यासह अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 35 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी रवीशंकर कोटा, व्यंकटेश नागनाथ कोटा, हनुमंत खुणे (करुल, ता.मोहोळ) व दौंड येथील संतोष सतीश शेळके याला अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe