३ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : येथील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत, याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहे.
याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केलेली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे-नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणात अडथळा ठरणारी २३७३ झाडे तोडण्याची व त्या झाडांच्या बदल्यात १० पट झाडे लावण्याची अट घालत परवानगी दिली होती.
त्या परवानगीनुसार २०२० पर्यंत कोणतीही कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून झाली नाही.सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी याबाबत जुलै २०२० मध्ये पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणमध्ये याचिका दाखल केली होती.या याचिकेत पहिल्यांदा संगमनेर तालुक्यात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात १० पट झाडे लावली नाही म्हणून कामकाज सुरू झाले होते.
नंतर या रस्त्याशी संबधित पर्यावरण मंजुरीतले मुद्दे घेऊन हा रस्ता ज्या-ज्या जिल्ह्यातून जातो त्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग या मुद्द्द्यांवर सुनावणी झाली.
त्यात ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहे. यामुळे राजगुरूनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर या तालुक्यातून जाणाऱ्या खेड-सिन्नर (पूर्वीचा पुणे-नाशिक) महामार्गाच्या दुतर्फाकडू नीम, वड, कंचन, पिंपळ, करंज या देशी जातीच्या ३९ हजार ५०० एवढी वृक्षांची लागवड होणार असून पुढील ५ वर्षे संगोपन करण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदार यांची असणार आहे.
वन्यजीव संस्था, वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी व उड्डाण पुल याबाबत केलेल्या संयुक्त पाहणी अहवालाचा आधार घेऊन माळवाडी येथे भुयारी मार्ग, खंदरमाळवाडी व कन्हे घाट येथे उड्डाणपूल तर वेल्हाळे, चंदनापूरी (जावळे वस्ती), डोळासणे येथे असलेल्या भुयारी मार्गात योग्य ते साऊंड आणि लाईट बसविण्याचे सुचवले होते.
त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहे.पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा निर्माण करण्याचेही आदेशात म्हटले आहे.सदर याचिकेत अॅड. ऋत्विक दत्ता, राहुल चौधरी, इतिशा यांनी काम पाहिले. तर पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी मार्गदर्शन केले.