Sangamner News : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून ७ जणांनी वकील व त्यांच्या दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील मच्छी मार्केटजवळ घडली.
या हल्ल्यात कोयता, लोखंडी गज, टोच्या व बेसवॉलच्या दांड्याचा वापर केला गेला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करणारे अॅड. शरीफ पठाण हे सुकेवाडी रोड परिसरात राहतात.

पठाण यांनी दि. ११ मे रोजी याच परिसरात राहणाऱ्या सादिक रज्जाक शेख याच्या विरुद्ध चोरीच्या कारणावरुन तक्रार केली होती. ही तक्रार मागे घ्यावी, यासाठी सादिक शेख व इतर शरीफ पठाण यांच्यासोबत वाद करून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत होते.
या कारणामुळे आरोपींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अॅड. पठाण व त्यांच्या कुटुंबियांसोबत वाद करून शिवीगाळ केली. यामुळे पठाण यांनी पुन्हा त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तक्रार दाखल केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी सायंकाळी हाणामारी झाली. शरीफ पठाण हे मासे खरेदी करण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये गेले असता या ठिकाणी सात वाजेच्या सुमारास आरोपींनी कोयता, लोखंडी गज, टोच्या व बेस बॉलच्या दांड्याने त्यांना मारहाण केली.
पठाण यांचे दोघे भाऊ या ठिकाणी आले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शरीफ पठाण यांचा भाऊ रिजवान गंभीर जखमी झाला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती समजताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले.
जखमींना जवळच असणाऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याबाबत अॅड. शरीफखान पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर मुरमुहम्मद शेख, आशफाक इब्राहिम पटेल या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.