Sangamner News : संगमनेर मध्ये अज्ञात चोरट्याने येथील हृदयरोग तज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या घरात प्रवेश करून कपाटाच्या लॉकर मधुन १५ लाख ७८ हजाराचे वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील नवीननगर रोड परिसरातील ताजने मळा येथे डॉ. गिरीश सावंत यांचे रुग्णालय आहे.
याच ठिकाणी ते वास्तव्यास आहे. ते कुटूंबीयांसह बाहेरगावी गेलेले होते. अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन २ ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये घरात प्रवेश करून चोरी केली.
डॉ. सावंत हे बुधवारी घरी परतल्यानंतर घरातून दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीतून आत प्रवेश केला. कपाटाच्या लॉकर मधून या चोरट्याने १५ लाख ७८ हजार किंमतीचे ५२६ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, कॉलर नेकलेस, पॅण्डल, नेकलेस, स्टड इयर रिंगस, गळ्यातील चैन, गळ्यातील वाट्या मणी व सोन्याचे कॉईन चोरून चोरट्याने पलायन केले.
याबाबत डॉ. सावंत यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करीत आहे.