अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी उपविभागातील कोपरगांव व राहाता तालुक्यात कोरोना लसीचा दुसरा डोस अनुक्रमे 27.96 टक्के व 35.07 टक्के लोकांनी घेतला आहे. कोरोना संक्रमणापासून स्वत: व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा.
तसेच ज्या लोकांनी अद्याप लसीचा पहिला डोस ही घेतलेला नाही. त्यांनी जबाबदारीने लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे. भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटक मध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी महाराष्ट्र सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेव्हा नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करून घ्यावे. शिर्डी उपविभागातील कोपरगांव तालुक्याची लसीकरणास पात्र लोकसंख्या 2 लाख 33 हजार 139 इतकी आहे.
त्यापैकी 1 लाख 78 हजार 967 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे पहिल्या डोसचे 76.76 टक्के लसीकरण झाले आहे. अद्याप 54 हजार 172 लोकांचे अद्याप पहिला डोस ही घेतलेला नाही. तर दुसरा डोस 65 हजार 193 लोकांनी घेतला आहे. म्हणजे दुसरा डोसचे 27.96 टक्के लसीकरण झाले आहे.
मात्र अद्याप 1 लाख 67 हजार 946 लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. राहाता तालुक्याची लसीकरणास पात्र लोकसंख्या 2 लाख 51 हजार 27 इतकी आहे. त्यापैकी 1 लाख 83 हजार 457 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे 73.08 टक्के लसीकरण झाले आहे.
अद्याप 67 हजार 570 लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. तर 88 हजार 23 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे 35.07 टक्के लसीकरण झाले आहे. अद्याप 1 लाख 63 हजार लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. कोपरगांव तालुका जिल्ह्यात लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी , आशा सेविका व संबंधित अधिकारी वाड्या-वसत्यांवर तसेच गावोगावी भेट देऊन नागरिकांना लस घेण्याबाबत जागृती करत आहेत. तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील एका केंद्राच्या माध्यमातून ‘हर घर दस्तक’ या मोहिमेच्या माध्यमातून प्रशासन शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करत आहे.
राहाता तालुक्यात कोरोना लसीकरण ही मोठ्या प्रमाणत सुरू आहे. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी, नांदुर खु. या गावांमध्ये शंभरटक्के लसीकरण झाले आहे. शिर्डी उपविभागातील या दोन्ही तालुक्यातील शंभर टक्के लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
तसेच ‘ओमेक्रॉन’ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. असे आवाहन ही गोविंद शिंदे यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम