११ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढावी.दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्यासाठी शासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी.शिर्डी शहर दहशतमुक्त करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे सांगितले.
शिर्डीतील ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर, दारू यासह सर्वच दोन नंबर अर्थात अवैध धंद्यांचा कायमचा बिमोड करून दहशतमुक्त शिर्डी निर्माण झाली पाहिजे. शिर्डी शहर व परिसरातील दादागिरी व गुन्हेगारी संपवण्यासाठी शासनाने पावले उचलावी.याकरिता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-64.jpg)
गुन्हेगार अथवा दादागिरी करणारा कोणत्याही पक्षाचा जातीचा, धर्माचा असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. कारण कुठलाही दोष नसताना दोन संस्थान कर्मचाऱ्यांची हत्या झाली.या दुहेरी हत्याकांडातील मृत दोन्ही संस्थान कर्मचारी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.
या दुहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने १० लाखांची आर्थिक मदत मिळावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस साईबाबा संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावे, तसे आदेश शासनाने देवस्थानला करावे, या कविता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
शिर्डीतील गुन्हेगारांचे थेट एन्काउंटर करा
शिर्डीत देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या ठिकाणी गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्या थेट एन्काऊंटर करा. शिर्डी देवस्थानाच्या ठिकाणची दादागिरी, गुन्हेगारी कायमस्वरूपी मोडीत काढून दहशतमुक्त शिर्डी शहर निर्माण करा, अशी मागणी माजी खासदार लोखंडे यांनी केली.