Shirdi News : साई भक्तांसाठी उभारलेल्या नवीन दर्शन रांगेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असतील, तर आणखी काही दिवस थांबून त्यांच्याच हस्ते या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करावे, कारण पंतप्रधानांचा हा चौथा जिल्हा दौरा असेल व कार्यक्रमाचे प्रक्षेपण संपूर्ण जगात होईल.
प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने करोडो साईभक्त हा कार्यक्रम बघतील. पंतप्रधानांना निमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण ‘विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे विनंती करणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी सांगितले.
या संदर्भात पत्रकात जगताप यांनी सांगितले, की अद्ययावत दर्शन रांग तातडीने सुरू व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे; मात्र या दर्शन रांगेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यास
शिर्डीचे नाव पुन्हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. दर्शनरांगेच्या शुभारंभानिमित्त पंतप्रधानांना आणण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री, महसूलमंत्री विखे पाटील, खासदार डॉ. विखे यांना भेटून विनंती करणार आहे.
साईबाबा संस्थानच्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या सव्वाशे कोटी रुपये खर्चाच्या अद्ययावत दर्शन रांगेचे काम पूर्ण झाले आहे; मात्र सदर रांग इमारतीच्या उद्घाटनाभावी श्री साईबाबा भक्तांसाठी खुली करण्यात आली नाही.
मागील काळातही मी दर्शन रांग साईबाबा भक्तांसाठी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली होती; मात्र उद्घाटनासाठी पंतप्रधान येत असतील तर आणखी काही दिवस थांबून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे, असे जगताप यांनी म्हटले आहे.