PM Modi Visit Shirdi : पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण विकास पर्वाची नांदी ठरणार !

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : शिर्डी आणि परीसराच्या विकासाकरीता केंद्र आणि राज्य सरकारचे भक्कम पाठबळ मिळत आहे. मागील नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतानाच सामान्य माणसाचे हित योजनांच्या माध्यमातून जोपासले.

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत होणे ही नव्या विकास पर्वाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील नियोजित दौर्याच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी सावळीविहीर येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेवून कार्यक्रमाची सविस्तर माहीती दिली.

गावपातळीवर लोकांपर्यंत पोहचून त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी बैठकांमधून केले. दि. २६ ऑक्टोबर रोजी होणारा पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा दौरा जिल्ह्यासाठी आणि शेतकरी वर्गासाठी नवी आशा देणारा ठरणार असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,

निळवंडे धरणांचे लोकार्पण ही या भागातील शेतकऱ्यांकरीता मोठी स्वप्नपूर्ती करणारा आहे. रोजगारभिमुख आणि लोककल्याणकारी योजनेची पायाभरणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणे जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय व राज्यातील मंत्री उपस्थित राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राप्रमाणेच नमो किसान सन्मान योजना सुरू केली.

त्या योजनेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून यानिमित्ताने शेतकरी मेळाव्यात तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या ८१ लाख लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधतील. मागील नऊ वर्षात देशातील विकासाला मोठी गती मिळाली आहे.

इतर देशांची अर्थिक व्यवस्था ढासळत असताना भारत देश आज तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. पाच ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल होत आहे.

केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे लाभार्थी आपण आहोत. कोविड संकटातून देश उभा राहीला लसीची निर्मिती करून त्याची निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगात झाली, हे मोदीच्या कार्याचे यश असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe