Shirdi News : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत दरवर्षी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शिर्डीत वाहनकोंडी होऊन भाविकांना त्रास होऊ शकतो. भाविकांना विनात्रास साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचता यावे,
यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शिर्डीतील पाच मार्गावर ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत नो-व्हेईकल झोन (वाहनविरहित क्षेत्र) घोषित केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी (दि.२८) याबाबत आदेश काढले आहेत. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ असून देश-विदेश, राज्य-परराज्यांतून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी शहरात वाहनांची व भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
नाताळ सण व नववर्ष प्रारंभ निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डी येथे साईदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यावेळी भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
त्यातच सिन्नर-शिर्डी हा महामार्ग शिर्डी शहरातून जात असल्याने गर्दीच्या कालावधीत वाहतुकीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच साई मंदिर व भाविकांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचून कायदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
यासाठी श्री साईबाबा मंदिर व परिसरात वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिर्डीतील साईमंदिर परिसरातील वर्दळीचे रस्ते नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आला आहे.
या आदेशानुसार दि. ३० डिसेंबर २०२३८ वाजेपासुन ते दि. २ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मनमाडकडुन अहमदनगरकडे जाणाऱ्या महामार्गावरील लक्ष्मीनगर टी पॉइंट ते नविन पिंपळवाडी चौक पर्यंतचा राष्ट्रीयमार्ग, जुना पिंपळवाडी रोड ( साईबाबा मंदीर, गेट क्रमांक १) ते साई उद्यान पर्यंतचा मार्ग,
साई तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र गेट क्रमांक ४ ते चावडी पर्यंतचा मार्ग. साईबाबा मंदिर गेट क्रमांक ४ ते कानिफनाथ चौकापर्यंत, श्री साईबाबा मंदिर चावडी ते १६ गुंठे, सिनिअर सिटीझन गेट ते जुना पिंपळवाडी चौक पर्यंतचा मार्ग, या ठिकाणी नो व्हेईकल झोन राहणार आहे,
तसेच शासकीय वाहने, मंदिर प्रशासनाने अत्यावश्यक कारणानिमीत्त परवानगी देण्यात आलेली वाहने यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.