Shirdi News : शिर्डीतून काही दिवसांपूर्वी हरवलेल्या वयोवृद्ध वडिलांच्या शोधात सैरावैरा फिरणारा ओरिसा येथील युवक रोज वडील पुन्हा भेटावे, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत होता.
अखेर सातव्या दिवशी एक पत्रकार व रिक्षाचालकाच्या प्रयत्नाने ते सापडतात आणि दोघांच्याही अश्रुंचा बांध फुटतो. हा प्रकार नुकताच शिर्डी येथे घडला. पत्रकार व रिक्षा चालकाच्या माध्यमातून आम्हाला देवदूतच भेटले असल्याची भावना या युवकाने व्यक्त केली.

त्याचे झाले असे, की काही दिवसांपूर्वी ओरिसा येथील भाविकांचा एक समूह शिर्डीतील चावडीजवळ एका हॉटेलला रूम घेऊन थांबला होता. त्यांच्यातील एक ७२ वर्षीय बैरागी राऊत नामक व्यक्ती साईंच्या दर्शनासाठी जायचे असल्याने हॉटेलबाहेर जाऊन थांबतो, असे पत्नीस सांगून १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता हॉटेलच्या बाहेर आले. त्यानंतर ते तेथून हरवले.
शोध घेऊनही सापडत नसल्याने पत्नी रडून रडून बेजार झाल्या. अखेर शिर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर ओरिसामध्ये असलेला मुलगा अजित बैरागी वडिलांचा शोध शिर्डीत आला. त्याने भोजनालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, मंदिरे, अशा विविध ठिकाणी फिरून शोध घेतला; परंतु त्यांचा शोध लागला नाही.
वडील फिरत फिरत दूरवर गेले असतील, असा अंदाज बांधून आजूबाजूच्या गावांमध्येसुद्धा शोध घेतला; पत्रके छापून ठिकठिकाणी लावली; मात्र शोध लागेना. अखेर शिर्डी येथील जागरुक पत्रकार प्रशांत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधत त्याने व्यथा मांडली. त्यानंतर अग्रवाल यांनी याची बातमी केली.
ही बातमी रिक्षा चालकाने पाहिली. या बातमीवरून त्याने या वृद्धास ओळखले व पत्रकार अग्रवाल आणि रिक्षाचालक प्रसन्ना हरणे यांनी मिळून बाबांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यांना मुलाच्या ताब्यात देण्यात आले.
वडिलांना पाहाताच मुलाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. आठ दिवसांपासून हरविलेल्या वडिलांची अवस्था पाहून मुलगा व्यथित झाला; मात्र बाबांवर असलेली श्रद्धा आणि गेल्या आठ दिवसांपासून ठेवलेल्या सबुरीचे हे फळ असल्याचे त्याने सांगितले.
मुलाने वडिलांना भरल्या डोळ्यांनी सोबत नेले; मात्र यावेळी जाताना त्याने साईबाबांचे, शिर्डी पोलिसांचे व रिक्षा चालकांचे मनापासून आभार मानत हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचा असल्याचे सांगितले व सर्वांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असे म्हणत सर्वांना कडकडून मिठी मारत निरोप घेतला.
तरूणाईसाठी आदर्श घटना
शिर्डी येथे वृद्ध आई-वडिलांना साई दर्शनाच्या नावाखाली आणून येथेच सोडून देण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. मात्र हरवलेल्या बापाचा शोध घेण्यासाठी ओडीसा येथून आलेला अजित सात दिवस शिर्डीत ठाण मांडतो,
परिसरातील गावे व सार्वजनिक ठिकाण जंग जंग पछाडून शोध घेतो, साईबाबांकडे सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतो. ही आजच्या तरुणाईसाठी आदर्श घटना आहे
असा लागला तपास
पुणतांबा येथील अख्तर पठाण या सज्जन रिक्षाचालकाने बैरागी यांना पुणतांबा येथे पाहिले होते. दोन तीन दिवसांपासून ते या परीसरात राहात होते. तेथील रिक्षा चालकांनी त्यांना जेवण पाणी दिले. त्यांची भाषा समजत नसल्याने त्यातील एका रिक्षा चालकाने याच्या कुटुंबाचा छडा लावायचा,
असा निश्चय केला व त्यांना रिक्षात बसवून शिर्डीत आणले. शिर्डीतील प्रसन्न हरणे या रिक्षा चालकाने त्यांना ओळखले. पत्रकार अग्रवाल यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी मुलास वडील सापडल्याची बातमी दिली.