Shirdi News : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ व पाठिंब्यासाठी शिर्डी शहरात रविवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
आज सोमवारी शिर्डी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. समाज बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. साईबाबा मंदिर व संस्थान व्यवस्था सुरू राहणार आहे. साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून अथवा त्यांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता व काळजी सकल मराठा समाज बांधव घेणार आहेत.
जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी सचिन चौगुले, अनिल बोठे, नितीन कोते, वीरेश बोठे, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर व अन्य समाज बांधव शुक्रवारपासून साखळी उपोषणास बसले आहेत.
आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी शिर्डीत कॅण्डल मार्चचे आयोजन केले होते. येथे सोमवारपासून राहाता तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सचिन चौगुले, अनिल बोठे, नितीन कोते, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर आदी समाजबांधवांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅन्डल मार्चमध्ये महिला तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. रविवारी साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नानासाहेब बोठे, नितीनराव कापसे, अभय शेळके, दशरथ गव्हाणे, शफीक शेख,
कनिफ गुंजाळ, चंद्रशेखर कालें, संग्राम कोते, फकीरा लोढा, सुनील बोठे, नवनाथ मुजमुले, सचिन शिंदे, चंद्रभान धनवटे, नाना काटकर, डॉ. मधुकर देशमुख, डॉ. पी.जी. गुंजाळ, सुरेश आरणे, भारत चांदोरे व विविध गावातील नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज सोमवार दिनांक ३० रोजी शिर्डी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी शहरातील हॉटेल व्यवसाय, उपहारगृह चालक तसेच छोटे-मोठे दुकानदार बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शिर्डी शहरातील सर्वच समाज बांधवांनी याबाबत निर्णय घेतला असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
पालखी मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.. राज्यात आंदोलनाची तीव्रता वाढत असून सरकारने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, म्हणून राज्यभरात अनेक गावांमध्ये बंद, साखळी उपोषण करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात आज बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमुळे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, छोटी मोठी दुकाने सर्वच बंद राहणार आहेत; मात्र साईबाबांचे मंदिर व दर्शन व्यवस्था संस्थानची कार्यालये व इतर व्यवस्था सुरू राहणार आहेत.