शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी, अधिकारी तोंड पाहून कारवाई करतायत…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिर्डी शहरातील साई मंदिर परिसरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान सदर कारवाईमध्ये दुजाभाव होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने अतिक्रमण कारवाईत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर मोठे दुकानदार यांना यातून अभय मिळत असल्याचे या हातविक्रेत्यांनी सांगितले आहे.

दरम्यान शिर्डी नगरपंचायतने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी दिवसेंदिवस उग्ररूप धारण केले असून अतिक्रमण केलेल्या फुटपाथविक्रेते, हातविक्रेते यांच्या वस्तू, तसेच सामान इतरत्र जप्त केले आहे.

शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून एकिकडे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्याने या मोहिमेचे स्वागत केले असले तरी दुसरीकडे फुटपाथविक्रेते यांनी नगरपंचायतच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत दुसर्‍याकडे बोट दाखवत सर्वसमान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नगरपंचायतचे कर्मचारी, अधिकारी तोंड पाहून कारवाई करत असल्याचा आरोप करत आम्हा गोरगरिबांना व्यवसाय करून देत नाही परंतु मोठ्या दुकानदारांची रस्त्यावर आलेली अतिक्रमणे दिसत नाही का?

याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगरपंचायतचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या फुटपाथ विक्रेत्यांकडून पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत दंडाची पावती फाडून घेत आहेत.

दंड भरूनही आपला जप्त केलेला माल पुन्हा जसाच्या तसा मिळेल याची काही खात्री नसल्याचे महिलांनी बोलून दाखवले आहे. नगरपंचायतच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करत असल्याचे महिलांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe