मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक – धंनजय मुंडे !

Ahmednagarlive24 office
Published:
dhannjay

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाज बांधवांना १० टक्के आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. सगेसोयऱ्यांचा विषय राहिलेला आहे, मात्र या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे.

संविधानाला धरून सगळ्या सुविधांची व्याख्या करून हा अध्यादेश न्यायालयात कुठेही अडचणीचा ठरू नये, तो न्यायालयात टिकावा व त्याचा सकल मराठा समाजाला फायदा व्हावा, अशी भूमिका सरकारची आहे. याकरीता जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय
मुंडे यांनी केले.

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त मंत्री मुंडे आले होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल भडांगे व पदाधिकारी होते. साईबाबा संस्थानच्या वतीने मंत्री मुंडे यांचा उपकार्यकारी अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केला.

माध्यमांशी बोलताना मंत्री मुंडे म्हणाले, गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मी साई मंदिरात आलो असून साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मला मोठी प्रेरणा व ऊर्जा मिळते. मराठा आरक्षणासंदर्भात ते म्हणाले की, मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक असून प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी समाज बांधवांना १० टक्के टिकणारे आरक्षण दिले. कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. आता सगेसोयऱ्यांचा एक विषय बाकी राहिलेला आहे परंतु हा विषय सोडविताना अगोदर सगेसोयऱ्यांची व्याख्या करणे कायदेशीरदृष्ट्या गरजेचे आहे.

ती व्याख्या संविधानाला धरून करावी लागेल. शासन निर्णय कुठल्याही न्यायालयात अडचणीचा ठरू नये. तो अध्यादेश न्यायालयात टिकला पाहिजे. या आधारे दिलेले आरक्षण पिढ्‌या‌न्पिढ्या टिकावे व त्याचा सकल मराठा समाज बांधवाला आरक्षणाच्या दृष्टीने फायदा व्हावा, ही सरकारची प्रामाणिक इच्छा आहे.

यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महायुती सरकारने यापूर्वीच टिकणारं आरक्षण दिले. यापुढेही आरक्षण टिकावं म्हणून सरकार कटिबद्ध राहणार आहे. विरोधकांबाबत मंत्री मुंडे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांची नेहमीच दुटप्पी भूमिका असते. त्या माध्यमातून ते मतांवर लक्ष केंद्रित करून राजकीय पोळ्या कशा भाजून घेतात, हे जनतेला माहिती आहे

विशाळगडाबाबत भूमिका स्पष्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगड येथे प्रत्यक्ष भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांनी कोणी अन्याय केला असेल, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ज्या कोणावर अन्याय झाला आहे, त्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील. अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे: मात्र ज्या महाविकास आघाडीला या मतदारांनी भरभरून मते दिली, ते नेते या प्रश्नावर गप्प आहेत, अशी टीका मंत्री मुंडे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe